सोलापूर (प्रतिनिधी ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने सह पोलीस उप-निरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक शहरात गस्त घालत असताना थोबडे वस्ती, जुना देगांव नाका येथील रोडचे डाव्या बाजूस झाडाखाली एक इसम संशयीतरीत्या प्लास्टीक पिशवी घेवून बसल्याचे दिसून आले. बराचवेळ त्याच्या हालचालीवर गोपनीयरित्या लक्ष ठेवले असता तो त्याच्या जवळील पिशवीतील पुड्या विक्री करत असल्याचे आढळुन आले.हा इसम वरील ठिकाणी गांजा विक्री करत असल्याचे प्रथमदर्शनी संशय आल्याने कायदेशीर प्रक्रीयेअंतर्गत त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असतात्याने आपले नाव रजाक गफुर शेख वय-४९ वर्षे व्यवसाय मजुरी रा.घर नं-०५ थोबडे वस्ती, जुना देगांव नाका, सोलापूर सांगितले.त्याच्या ताब्यातील प्लास्टीक पिशवीबाबत विचारपूस करुन पाहणी केली असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच अधिक चौकशीमध्ये त्याने त्याचे राहते घराच्या कंम्पाऊंडमध्ये व घरासमोरील परिसरामध्ये एकुण ५९ गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे आढळून आले.
त्यानंतर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत रजाक गफुर शेख याच्या कब्जातील प्लास्टीक पिशवीमधील २२७ ग्रॅम गांजा तसेच त्याने लागवड केलेली ५९ गांजाची झाडे उपटून त्यांचे वजन २१.२१२ किलो ग्रॅम असा एकूण २१.४३९ किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. रजाक गफुर शेख याने विक्री करीता स्वतःच्या ताब्यात गांजा बाळगल्याचे तसेच विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाच्या झाडांची अवैधरित्या लागवड केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं.२८७/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम-२० (अ), २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/वि.शा.) राजन माने, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार-नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, भारत पाटील, अजिंक्य माने, सिध्दाराम देशमुख, महेश रोकडे, शैलेश बुगड, अभिजीत धायगुडे, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, अर्चना स्वामी, चालक बाळु काळे यांनी केली आहे.

