सोल्लापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील घरफोडी, जबरी चोरीसह वाहन चोरीच्या ३२५ गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या पथकांनी एका वर्षात केली आहे. त्यात सात दिवसा घरफोड्या, रात्रीच्या ४४ घरफोड्या, १४ जबरी चोरी, चोरीला गेलेल्या १६१ दुचाकी व दोन चारचाकीसह इतर ९७ चोरीचे गुन्हे आहेत. पोलिसांनी केवळ चोरट्यांना शोधलेच नाही तर त्यांच्याकडून तब्बल तीन कोटी रूपयांचा ऐवज देखील हस्तगत केला.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ वा काळात सोलापूर शहर गुन्हे शाखेने कौतुकास्पद कामगिरी करीत गुन्हेगारांच्या
मुसक्या आवळल्या आहेत. तडीपार करूनही शहरात फिरणाऱ्या १६ जणांना पकडले. विविध गुन्ह्यातील ४२ वॉन्टेड (पाहिजेत) आरोपींनाही पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. एमडी ड्रग्ज, गांजा जवळ बाळगणाऱ्यांनाही गुन्हे शाखेच्याच पथकाने जेरबंद केले. बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुर्गी नाला परिसरातील एका तृतीयपंथीचा खून करणाऱ्या तिघांना अवघ्या सहा तासातच गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते. शहरातील २५ सराईत गुन्हेगारांना 'एमपीडीए'च्या माध्यमातून येरवडा कारागृहात पाठविण्यातही शहर गुन्हे शाखेची मदत झाली आहे. दरम्यान, सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत दाखल गुन्ह्यापैकी ९५ टक्के गुन्ह्यांचा छडा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे.
२०१९ ते २०२४ या सहा वर्षांच्या तुलनेत २०२५ मधील शहर गुन्हे शाखेची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. चोरट्यांनी चोरलेला दोन कोटी ९९ लाख ३६ हजार ९४९ रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत करून तो संबंधित फिर्यादीस परत देखील दिला आहे.
*गुन्हे शाखेची सहा पथके कार्यरत*
सोलापूर शहरात पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके कार्यरत असून या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, विजय पाटील निलेश सोनवणे, शंकर धायगुडे दत्तात्रय काळे, व शैलेश खेडकर हे सहभागी असून यात पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड श्यामकांत जाधव यांचाही समावेश आहे.
