Type Here to Get Search Results !

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते ग्रामीण व शहरी पोलीस दलाला आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता अधिक सक्षम करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून एकूण 117 आपत्ती प्रतिसाद किट प्राप्त झाले आहेत. यामध्ये सोलापूर पोलीस ग्रामीण यांना 83 किट तर सोलापूर पोलीस शहर यांना 34 किट देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील तसेच शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन व पोलीस चौकीसाठी एक किट राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. कोल्हापूर पोलिस परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते आपत्ती प्रतिसाद किट चे आज वाटप करण्यात आले. 

    यावेळी पोलिस आयुक्त श्री. एम. राजकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. शक्तीसागर ढोले उपस्थित होते.


या किटमध्ये आपत्तीच्या वेळी तातडीने उपयोगी पडणारी महत्त्वाची साधने समाविष्ट आहेत. त्यात फोल्डिंग फोल्डेबल स्ट्रेचर, सेफ्टी नेट, रॅपलिंग रोप, हॅन्ड ग्लोज, ऍडव्हान्स लाइफ जॅकेट, डिझास्टर किट इत्यादी साहित्याचा समावेश आहे. या साधनांमुळे आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविणे, बचावकार्य करणे आणि जीवितहानी टाळणे अधिक सुलभ होणार आहे.  


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही किटे पोलीस दलाला वितरित करण्यात आली. यावेळी प्राधिकरणाने सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाची सज्जता महत्त्वाची आहे.  


या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील पोलीस दल आपत्तीच्या प्रसंगी अधिक तत्परतेने प्रतिसाद देऊ शकेल. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळेल आणि आपत्ती व्यवस्थापनाची कार्यक्षमता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. 


दरम्यान, अलीकडील पूरस्थिती व पंढरपूर वारीदरम्यान Zero Casualty Model यशस्वीपणे राबविल्याबद्दल मा. पोलीस महानिरीक्षक महोदयांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक केले. पंढरपूर वारीदरम्यान त्यांनी स्वतः भेट देऊन संपूर्ण बचाव व व्यवस्थापन कार्याची पाहणी केली होती.  


कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बजरंग होटकर, शुभांगी गवते, साक्षी सर्वगोड, संतोष वायदंडे, सखू कुंचाटे व सागर धप्पाधुळे या आपदा मित्र/सखी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव साहित्याची माहिती दिली. तसेच आपत्ती काळात या साहित्याचा उपयोग कसा करावा याबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.