पुणे : राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांना केंद्र शासनाचे ‘मेरिटोरियस मेडल’ घोषित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अनुषन्गाने केंद्र शासनाच्या वतीने पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. हिरेमठ हे सन 2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून यशस्वी कारकिर्द निभावली आहे. यासोबतच त्यांनी पदोन्नती मिळाल्यानंतर काही दिवस सोलापूर पोलिस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावले आहे.
अतिशय कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी अशी ओळख असलेली सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात म्हणजेच सीबीआयमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस उप महानिरीक्षक म्हणून सुद्धा ते कार्यरत राहिले होते. प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये काम केल्यानंतर त्यांची पुन्हा राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. हिरेमठ यांना ‘मेरिटोरियस मेडल’ घोषित झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे..
