Type Here to Get Search Results !

सोलापूर तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : सोलार प्लांट चोरी प्रकरणी 10.78 लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

 



सोलापूर  (प्रतिनिधी) 

उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कौठाळी येथील सोलार प्रकल्पावर झालेल्या मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा सोलापूर तालुका पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे.या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10 लाख 78 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच या गुन्ह्यात दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचेही उघडकीस आले आहे.


मौजे कौठाळी ते वैराग रोडलगत पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सोलार प्लेटद्वारे वीज निर्मितीचे काम सुरू आहे.या ठिकाणी कॅबीनसमोर ठेवलेले सोलार प्लेट व पॅनल स्ट्रक्चर अँगल असा 8 लाख 78 हजार 190 रुपयांचा साहित्य 23 नोव्हेंबर 2025 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता.याप्रकरणी आदित्य भाऊसाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.त्या आधारे पोना अनंत चमके व पोलीस पथकाने कौठाळी परिसरात शोधमोहीम राबवून पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले.चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली.


तपासात पोलिसांनी चोरीसाठी वापरण्यात आलेले अशोक लेलँड दोस्त कंपनीचे मालवाहू वाहन (किंमत अंदाजे 2 लाख रुपये), तसेच 102 नग सोलार प्लेट (7.65 लाख रुपये) व 147 नग धातूचे सोलार पॅनल स्ट्रक्चर अँगल (1.13 लाख रुपये) असा एकूण 10.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर व परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पो.हवा राहुल महिंद्रकर, पोना अनंत चमके, पोना लालसिंग राठोड, पोको पैंगबर नदाफ, वैभव सूर्यवंशी व सागर शिवे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.


दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोना अनंत चमके करीत आहेत..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.