सोलापूर (प्रतिनिधी ) तुळजापूरहून सोलापूरच्या एसटी स्टॅण्डवर आलेल्या ५९ वर्षीय महिलेच्या पर्समधील दागिने व रोकडची चोरी झाली होती. जयश्री दत्तात्रय झुंजकर (रा. गौडगाव, ता. बार्शी) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी १२ तासांत चोरट्याला शोधून महिलेचे दागिने व रोकड हस्तगत केली. चोरीला गेलेले दागिने पाहताच त्या महिलेला अश्रू अनावर झाले होते.
१३ नोव्हेंबर रोजी जयश्री झुंजकर या तुळजापूरवरून सोलापुरात आल्या होत्या. १५ मिनिटांनी त्या सोलापूर-सांगोला बसमधून बेगमपूरला जात होत्या. बसमध्ये चढताना गर्दीत त्यांच्या पर्समधील दागिने व रोकड, असा दोन लाखांचा
ऐवज चोरी झाला होता. तिकीट काढताना पर्स उघडल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले आणि त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली. गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख
सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने चोरट्याचा शोध सुरु केला.
सीसीटीव्ही फुटेज पडताळल्यावर १९ वर्षीय मुलीवर संशय बळावला. पोलिसांनी तिच्याबद्दल माहिती काढली. त्यावेळी ती सोलापुरातील झोपडपट्टी क्र. 02 रहायला
असल्याचे समजले. ती मूळची कलबुर्गी (कर्नाटक) येथील असून शिल्पा वेळू उपाध्ये (वय १९) असे तिचे नाव आहे. सराफ कट्टा येथे दागिने विकायला ती येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक श्री.संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हवालदार प्रवीण चुंगे शिवानंद भीमदे, शशिकांत दराडे विनोद व्हटकर, कृष्णा बडुरे, अमोल खरटमल, विनोदकुमार पुजारी, अजय चव्हाण, ज्ञानेश्वर गायकवाड, तौसिफ शेख, अतिश पाटील, सूरज सोलवनकर यांच्या पथकाने पार पाडली.
*दुचाकी चोरटे देखील पोलिसांच्या जाळ्यात*
उत्तर कसबा येथील रोहन पांढरे यांच्या घरासमोरून चोरट्याने दुचाकी चोरून नेली होती तसेच शहरात अन्य ठिकाणी देखील दुचाकी मोटारसायकलीच्या चोऱ्या झाल्या होत्या त्या अनुषंगाने फौजदार चावडी पोलीसांच्या डी बी पथकाने तपास केला त्यावेळी जुनीमील कंपाउंड परिसरातील मैदानात दोनजण संशयितरित्या फिरताना दिसले विशाल विलास राठोड व प्रदीप सुभाष राठोड विजयपूर (कर्नाटक ) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
