अक्कलकोट (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीतील नागरिकांना व ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दानशूर व्यक्ती व संस्थांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या वतीने बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे सुमारे ५० लाख रुपयांचे ५ हजार
किट दिले जाणार आहेत. तसेच अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पूरग्रस्त महिलांना एक हजार साड्यांचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
अमोलराजे जनमेजयराजे भोसले म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य व शिधा असलेले सुमारे ५० लाखांचे ५ हजार किट अन्नछत्र मंडळाकडून देण्यात येणार आहेत. तसेच न्यासाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त महिलांसाठी १ हजार साडीचोळीचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात येणार आहे.
न्यासाचे सचिव शामराव मोरे म्हणाले, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे धर्मादाय न्यास गेली ३८ वर्षे स्वामीचे अत्रदानाचे कार्य सातत्याने करीत आहे. सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा व पर्यावरणपूरक असे विविध उपक्रम सदैव राबवित असते. तसेच पूरग्रस्त, जळीतग्रस्त, भूकंपग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देत असते. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक तालुके बाधित झाले आहेत. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस मनोज निकम, अरविंद शिंदे हे उपस्थित होते.
