नाझरे (प्रतिनिधी ) चोपडी, नाझरे
परिसरात गेली दोन दिवस प्रचंड पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे चोपडी येथील गावतळे पूर्णपणे भरले आहे. यामुळे येदुचामळा, रानमळा, सोमेवाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. आज रानमळ्यातील एका महिलेचे निधन झाले. या महिलेची अंत्ययात्रा गुडघ्याभर पाण्यातून ग्रामस्थांनी चोपडी येथील स्मशानभूमीत आणली
चोपडीतील रानमळा येथील अप्पासाहेब विठोबा बाबर व विष्णू विठोबा बाबर यांची बहीण श्रीमती वैजयंता यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी चोपडी येथील स्मशानभूमी सकाळी दहा वाजता होणार होता. अंत्ययात्रा रानमळा येथून निघाली. मात्र गाव तळ्याजवळ आल्यानंतर रस्त्यावर असणाऱ्या गुडघ्याभर पाण्यातून ही अंत्ययात्रा कशीबशी बाहेर
पडली. अंत्ययात्रेस खांदा देणाऱ्या खांदेकऱ्यांचे खूप हाल झाले. खरंतर गेल्या आठवड्यापासून हा रस्ता बंद आहे. गाव तळ्याच्या काठावरून घसरड्या रस्त्यातून त्या भागाकडे लोक जात आहेत. या गोष्टीची दखल प्रशासनाने घ्यायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे येदुचामळा, रानमळा, यादवमळा, चौगुले मळा, जयराम मळा, गव्हाणे वस्ती या मळ्याकडे जाणाऱ्या लोकांचे हाल होत आहे.
मरणानंतर देखील यातना कायम प्रशासनाच्या उदासीनतेचा असा दुःखद अनुभव पाहायला मिळाला.
