सोलापूर (प्रतिनिधी) दारूच्या नशेत यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून दोघांनी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तुरे वस्तीतील ज्ञानसंपदा वाचनालयाजवळ तरुणावर कोयत्याने वार केले. त्यात डोक्याला, खांद्यावर वार बसल्याने जखमी झालेल्या तरूणास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवप्रसाद विजय करूटे (रा. मल्लिकार्जुन नगर, हत्तुरे वस्ती) हा सोमवारी साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून ज्ञानसंपदा वाचनालयाजवळून घरी जात होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा आकाश रायचूर हा त्याठिकाणी आला. त्याच्यासोबत त्याचा मित्र प्रसाद देखील होता. दोघांनी शिवप्रसाद याची दुचाकी आडवली. त्यानंतर त्याला शिवीगाळ करीत मागील भांडणाचा विषय उकरून
काढत आकाशने त्याच्या हातातील कोयत्याने शिवप्रसादच्या डोक्यात वार केला. त्यानंतर खांद्यावरही वार केला. रक्ताळलेल्या शिवप्रसादने आरडाओरड सुरू केली आणि दोघेही तेथून पळून गेले. शिवप्रसाद करूटे याच्या फिर्यादीवरून त्या दोघांवर जबर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्या दोघांना रात्री साडेसातच्या सुमारास अटक केली असून त्यांना आज (बुधवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही लोखंडी हत्याराने मारहाण, अपहरण करून मारहाण, बलात्कार, चोरी, हाणामारी असे गुन्हे घडले आहेत. त्यामुळेच पोलिस आयुक्तालयाने विमानतळ पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृहविभागाला पाठवला आहे.
