सोलापूर :- माळशिरस तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत नेवरे येथे पंतप्रधान आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना , मोदी आवास योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, याविरोधात कारवाईसाठी सोलापूरमध्ये उपोषण करण्यात येणार आहे.
श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नाही. २८ मे २०२५ रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस आणि जिल्हा परिषद सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप चौकशी सुरू झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचारी लाभार्थी आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या चौकशी प्रकरणी १५ ऑगस्ट २०२५ रोजी बोगस आवास लाभार्थी, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांच्यावर कारवाई करण्यासाठी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर , जिल्हापरिषद कार्यालय , सोलापूर पूनम गेट समोर स्वातंत्र्य दिनी तक्रारदार एक दिवसीय लक्षणीय उपोषण करत आहेत.उपोषणाच्या वेळी मा. देवकुळे साहेब, तहसीलदार,गृह विभाग शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर,यांच्या वतीने निवेदन स्वीकारले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
