सोलापूर (प्रतिनिधी ) स्वातंत्र्यदिनाच्या : निमित्ताने यंदा सोलापूर शहर-ग्रामीण पोलिस दलातील सात जणांसह राज्य राखीव पोलिस बल क्र. दहा आणि केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील प्रत्येक एका अंमलदारास राज्य सरकारकडून विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. सोलापूर शहर पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला असून, सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
गडचिरोलीतील नक्षलग्रस्त नागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी अंमलदारांनाही राज्याच्या गृह विभागाने विशेष सेवा पदके
जाहीर केली आहेत. त्यात सोलापूर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर, पोलिस उपनिरीक्षक गुलाब आडे, विकास गाडे, पोलिस अंमलदार सचिन कापसे, आकाश गाडेकर, गणेश गुसिंगे (राज्य राखीव पोलिस बल क्र. दहा), पोलिस प्रशिक्षण केंद्रातील हवालदार भागवत सानप, सोलापूर शहर पोलिसांतील सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष देशपांडे, अंमलदार औदुंबर टरले यांचा समावेश आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात यंदा एकमेव राष्ट्रपती पदक सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांना जाहीर झाले आहे. त्यांची सेवा व उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हे पदक मिळाले आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस आयुक्त एम राज कुमार यांनी पदके जाहीर झालेल्या सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
