सोलापूर (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता आठवीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कराड येथून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत त्या मुलीसह तरुणाला शोधले. सिद्राम बुक्का (रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे रहायला असताना संशयित सिद्रामची त्या मुलीशी ओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय हत्तूर येथे राहायला गेले होते. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी ती मुलगी सकाळी साडे सहा वाजता घरातून बाहेर पडली होती. ११.३० वाजल्यानंतरही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इतरत्र शोध घेतला, मैत्रिणींकडे विचारपूस केली, परंतु मुलगी सापडली नाही.त्यानंतर मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शाळा ते सोलापूर एसटी स्टैंड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळ च्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी पाठलाग केला व मोहोळ बस स्टँडवर चौकशी केली. दुचाकी मोहोळमध्ये लावून तो तरुण एसटीने कराडला गेल्याची माहिती मिळाली. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक कराडच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी कराड येथून दोघांनाही सोलापुरात आणले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, पो.नि. तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक सतीश बावणे यांच्या नेतृत्वातील पोलिस अंमलदार अयाज बागलकोटे, अमोल खरटमल , सूरज सोनवलकर अमोल पवार यांच्या पथकाने पार पाडली.
