Type Here to Get Search Results !

गणेशोत्सव मिरवणूक मार्ग पाहणी व विसर्जनासाठी कृत्रिम कुंड आणि मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था ; पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेची सज्जता : ११ कुंड व ६९ मूर्ती संकलन केंद्रे



सोलापूर (प्रतिनिधी)- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ तसेच सर्व मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली. याशिवाय विष्णू घाट, गणपती घाट, छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील कृत्रिम विसर्जन कुंडांचीही पाहणी करण्यात आली.यंदा शहरात ११ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तसेच ६९ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार असून नागरिकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.या पाहणी दरम्यान आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मिरवणूक मार्गावर पुरेशी प्रकाशयोजना करणे, झाडांच्या फांद्या छाटणे, मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळा आणणाऱ्या केबल वायरींचे नियोजन करणे, विसर्जन कुंडांवर अधिक प्रकाशयोजना करणे, अधिक अधिकारी, कर्मचारी याची नेमणूक करणे,मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर जनावरे येणार नाहीत याची काळजी घेणे तसेच मिरवणूक मार्गावर ड्रेनेजचे पाणी वाहणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अक्कलवार, अतिक्रमण व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी गणेशोत्सव हा शहराचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून तयारी पूर्ण करावी, असे सूचना संबंधित अधिकारी यांना दिले .यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.