सोलापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंगळवारी (ता. २६) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायदा - सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या.
विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी हे मंगळवारपासून सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांसह येत्या काळातील कायदा व सुव्यवस्था याचा आढावा घेतला. ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यातील गणेश मंडळ, एक गाव एक गणपती, नो डीजे नो डॉल्बी यासंदर्भात केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई, बंदोबस्त आराखडा याची
-त्यांनी माहिती घेतली. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ग्रामीण पोलिस मुख्यालयाला भेट दिली. तेथील कामकाजाची पाहणी केली. येत्या काळातील उत्सवांच्या बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था यासंदर्भाने मुख्यालयातील शीघ्र कृती दल, दंगा काबू पथकांची पाहणी केली. याप्रसंगी पोलिस मुख्यालयात वृक्षारोपण केले. तर बुधवारी (ता. २७) मुख्यालयात बाल गणेश मंडळाने प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्तीच्या आरतीस हजेरी लावली. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक शिरीष हुंबे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.
