सोलापूर (प्रतिनिधी ) राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील १९ दिवसांत हातभट्ट्यांवर धाडी टाकून ४३ हजार लिटर गुळमिश्रित रसायन, दोन हजार ८१२ लिटर हातभट्टी व देशी-विदेशी दारू, असा एकूण २० लाख ७९ हजार २२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विभागाच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील गावागावात हातभट्टीची खुलेआम विक्री होत आहे. देशी-विदेशी दारूचे दर वाढल्याने हातभट्ट्यांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ ते १९ ऑगस्ट या काळात हातभट्ट्यांसह अवैध दारुची विक्री
करणाऱ्या १०९ जणांवर कारवाई केली आहे. १९ दिवसांत १२५ गुन्हे दाखल केले आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या साडेचार महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील ३५ ढाब्यांवर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. ढाब्यावर मद्यपानास परवानगी नसताना देखील या ढाबा मालक-चालकांनी त्याठिकाणी ग्राहकांसाठी मद्यपानाची सोय करून दिली होती. त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून पाच लाख ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आता आगामी काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके हातभट्ट्यांवर वारंवार कारवाई करतील, असे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
.jpg)