सोलापूर (प्रतिनिधी) शहरात पुन्हा बेकायदेशीर बॅनर, फ्लेक्स लावण्याचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आठ विभागीय कार्यालयाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे.
महापालिकेने विधानसभा निवडणुकीनंतर शहरात बेकायदेशीर बॅनर लावणाऱ्यांना चाप लावला होता.
रस्त्याच्या दुभाजकांमध्ये फलक लावणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा बसला होता. मात्र, अलीकडच्या दोन महिन्यांत चौका-चौकात बेकायदेशीर फ्लेक्स वाढत आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारी वाढू लागल्याने प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी दोन महिन्यांपूर्वी प्रकाश घोडके या कार्यकर्त्याने सात रस्ता चौकात फ्लेक्स लावला होता. या फ्लेक्स काढणारे पोलिस कर्मचारी आणि मनपा अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव आला होता.
