सोलापूर (प्रतिनिधी) महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता या पदावर पुन्हा एकदा उपअभियंता व्यंकटेश चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी हे पद आहे. चौबे यांनी अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला होता. परंतु आयुक्तांनी तो नामंजूर केला असल्याचे सांगण्यात आले. आता त्यांच्याकडे पूर्णवेळ सार्वजनिक आरोग्य अभियंता या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. उपअभियंता व्यंकटेश चौबे यांनी ८ जानेवारी २०२५ रोजी स्वेच्छानिवृत्तीचा विनंती अर्ज सादर केला होता. तसेच ते स्मार्ट सिटी योजनेतील समांतर जलवाहिनीचे काम पाहात होते. दरम्यान, प्रशासकीय कामकाजाच्या सोयीकरिता सार्वजनिक आरोग्य अभियंता या पदावर उपअभियंता तपन डंके यांची नियुक्ती करण्यात आली होती.
उपअभियंता तपन डंके यांच्याकडे २१ मे रोजी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंतापदाची जबाबदारी सोपविली होती. अवघ्या २१ दिवसानंतर डंके यांच्याकडे परिवहन, अतिक्रमण आणि आणि मंडई-कोंडवाडा, लायसन परवाना विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग, महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय या चार विभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
