Type Here to Get Search Results !

तिघे सराईत गुन्हेगार सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; डीसीपी विजय कबाडे यांची कठोर कारवाई

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी व सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी तीन सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलत त्यांना दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्याच्या सीमा ओलांडून तडीपार केले आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:


१. सतिश दत्ता जाधव (वय – ३१ वर्षे):

रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ०३, सोलापूर

सतिश जाधव याच्याविरुद्ध २०२० ते २०२४ या कालावधीत घरफोडी व जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सलगर वस्ती पोलीस ठाण्याने त्याच्याविरोधात तडीपारची शिफारस केली होती.


२. शाहरुख गुडुभाई पटेल (वय – ३१ वर्षे):

रा. ७१, विष्णु नगर भाग-२, मजरेवाडी, सोलापूर

शाहरुख पटेल याच्याविरुद्ध २०१७, २०१९, २०२३ व २०२४ या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगल घडवून आणणे, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच महिला अत्याचार यांचा समावेश आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून त्याच्यावर तडीपारचा प्रस्ताव देण्यात आला होता.


३. प्रेम भास्कर कुणी (वय – २५ वर्षे):

रा. ५०, राज नगर, बोळकोटे नगरच्या बाजूला, एमआयडीसी, सोलापूर

प्रेम कुणी याच्याविरुद्ध २०१८ ते २०२४ या कालावधीत घरफोडी, चोरी, दरोड्याचा प्रयत्न आणि महिला अत्याचार यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपाराची कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.


या तिघांचा गुन्हेगारी वावर सातत्याने वाढत असल्यामुळे, स्थानिक नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाल करत, कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.


पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांच्या या कारवाई चे नागरिकांमध्ये स्वागत होत असून, गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा कठोर निर्णयांची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.