सोलापूर, (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातीलआंतरराज्य
गुन्हेगार अनिलकुमार राजभर हा चक्क विमानाने येऊन सोलापुरात चोरी करत होता. शहर गुन्हे शाखेने त्याला अटक करून त्याच्याकडील चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत केला होता. तो सध्या कोठडीत असून त्याच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाने हरकत घेतली आणि न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे.
११ मार्च २०२५ रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घर बंद करून कुलूप लावून ड्यूटीवर गेल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या घरातून अनिलकुमार राजभर याने दहा तोळे दागिने व रोकड चोरून नेली होती.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने यशस्वी तपास केला आणि उत्तरप्रदेशातील त्या आंतरराज्यीय चोरट्यास जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध पूर्वीचे महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांमध्ये एकूण ३५ गुन्हे दाखल असल्याची माहिती सोलापूर शहर पोलिसांनी संकलित केली. राजभर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या गुन्हेगारी वर्तनामुळे सामान्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे, असा सरकार पक्षातर्फे अॅड. अनघा लिंबोळे व अॅड. मुनजरीन जेलर यांनी युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने संशयित आरोपीचा जामीन फेटाळला.
