सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील ६ महसूल सहायकांना सहायक महसूल अधिकारी व पुरवठा निरीक्षकपदी पदोन्नती देण्याबरोबरच ७ शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच महसूल सहायक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार, वाहनचालक व शिपाई अशा एकूण ३८ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शोभा कुलकर्णी, जाकीरहुसेन जहागीरदार, के. ए. क्षीरसागर तिघा महसूल सहायकांची सहायक महसूल अधिकारी म्हणून तर सुकेशनी जाधव, जयंत कुलकर्णी व लाडलेमशाक शेख या तिघा महसूल सहायकांची पुरवठा निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. कायम करण्यात आलेल्या शिपायांमध्ये रेखा गायकवाड, पद्मलता जाधव, विठ्ठल बोमणे, विश्वनाथ झगळघंटे, श्रीकांत वाघमारे, नौशाद शेख व दत्तात्रय कोळेकर यांचा समावेश आहे.
महसूल सहायक २९, अव्वल कारकून ५, नायब तहसीलदार १, वाहनचालक १ आणि शिपाई २ अशा एकूण ३८ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित योजना लागू झाली.
महसूल कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड यांनी या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याची दखल घेत आदेश काढून कर्मचाऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला.
दरम्यान, पदोन्नती, कायम प्रमाणपत्र, सुधारित आश्वासित योजना लागू केल्याबद्दल जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, जिल्हा सचिव रवी नष्टे, कार्याध्यक्ष गजानन गायकवाड, लक्ष्मीकांत आयगोळे, रणजीत म्हेत्रे, गंगाधर हाके, विनायक चव्हाण, उमेश काळे, श्रीकांत घुगे, अनंत डेपाळ, सहदेव काळबेरे यांच्यासह अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
