सोलापूर (प्रतिनिधी ) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालायात एका महिलेच्या प्रसूतीसाठी तब्बल १० लाख रुपये अनामत रक्कम भरण्याचे प्रकरण ताजे असतानाच माढा येथून गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे प्रसूत झालेल्या एका महिलेला तिची रुम साफ करायची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या पतीला सात दिवस स्वच्छतागृह देखील साफ करावे लागले असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार माढा ग्रामीण रुग्णालयात घडला आहे. या रुग्णालयात माढा तालुक्यातील खैराव गावाच्या हेमा शैलेश घडे या प्रसूत झाल्या होत्या. या रुग्णालयात त्या एकूण सात दिवस होत्या. या सातही
दिवस त्यांच्यावर स्वतः रुम साफ करण्याची वेळ आली तर त्यांच्या पतीनेच रुममधील टॉयलेट साफ केले आहे.
घडे यांच्या कुटुंबीयांनीच हा विदारक अनुभव सांगितला आहे. हेमा धडे यांचे सिझर झाले होते. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना प्रचंड त्रास होत असतानाही त्यांना त्यांच्या रुमची साफसफाई करावी लागली. रुमची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारीच न आल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. दरम्यान, हा विदारक अनुभव आल्यानंतर माढा ग्रामीण रुग्णालयाच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी शंभू साठे यांनी केली आहे.
मुळात माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयाचा एकूणच कारभार
हा रामभरोसे चालत आहे. येथे वेगवेगळ्या विभागाचे डॉक्टर असून त्यांना दररोज ड्यूटी असताना येथे दिवस वाटून घेऊन बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जाते.. याची पद्धत देखील वेगळी आहे. केवळ केसपेपर घेऊन आलेल्या रुग्णांना काय त्रास आहे एवढे विचारून औषधे दिली जातात. प्रत्यक्ष तपासणी करण्याची तसदी घेतली जात नसल्याचे समजते.
शहरातील इतर खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याच जबाबदारी देखील या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांवर असते. त्या बाबतीत देखील निष्काळजीपण केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.
मध्यंतरी याबाबत एक आंदोलन देखील झाले होते पण येथील कारभारात सुधारण होण्याची लक्षणे दिसत नाहीत.
