सोलापूर (प्रतिनिधी ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पोस्टर ओंकार फाडल्याने शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाईची मागणी पुढं आलीय. गतवर्षात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याने ओंकार चव्हाण याला यापूर्वीच पदावरून हकालपट्टी करण्यात आलीय, तो शिवसेनेचा सामान्य सभासदही नाही, असं उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी म्हटलंय.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्फ संबंधी भूमिकेला विरोध प्रदर्शित करण्यासाठी गुरुवारी, ओंकार चव्हाण या व्यक्तीनं, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पोस्टर फाडले.
उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करत बिल मंजूरीला खासदारानी विरोध केला अन् त्यांनी हिंदुत्व सोडले. त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देत आहोत, असं ओंकार चव्हाण यानं असत्य व खोटे कारण पुढे केलं, मात्र पक्ष विरोधी कारवायामुळे यापूर्वीच शिवसेनेतून काढून टाकण्यात आलंय.
ओंकार चव्हाण याच्या कृतिमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या माथेफिरूवर तात्काळ कारवाई करून अटक करावी, अन्यथा शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील, असं जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले.
पक्षविरोधी कारवाई केल्याने ओंकार चव्हाण याला पदावरून यापूर्वीच हटवले असून, त्याचे पक्षाशी कोणतेही संबंध नाहीत, असंही जाहीर केलं आहे. याचबरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवसैनिकांच्या मते, “हा प्रकार केवळ उद्धव ठाकरे यांच्याच नव्हे, तर संपूर्ण शिवसेनेच्या विचारधारेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान आहे.” असंही प्रा. दासरी यांनी म्हटलंय.
शिवसेनेने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, हिंदुत्व आमच्या हृदयात आहे, पण द्वेष आणि फोडा-फोडीच्या राजकारणाला थारा नाही. पक्षशिस्त आणि नेतृत्वाचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहरप्रमुख भैय्या धाराशिवकर, दत्ता वानकर, विधानसभा प्रमुख दत्ता माने, निवडणुक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार, कामगार सेना सचिव अजय खांडेकर, उपशहरप्रमुख चंद्रकांत मानवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
