सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक शाखेतील काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नसतात; मात्र गल्लीबोळात समूहाने उभे राहून वाहनचालकांना अडविण्याचे प्रकार सुरू असल्याबद्दल निवेदनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, काही वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे प्रकार समोर आल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी केली जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारांचे व्हिडिओ व इतर पुरावे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध नसून, नियमांच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करावी, अनधिकृत आर्थिक वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अधिकृत ई-चलनाद्वारेच दंड आकारावा, सीसीटीव्ही फुटेज तपासून तक्रारींची चौकशी करावी तसेच नागरिकांसाठी स्वतंत्र तक्रार यंत्रणा सुरू करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
सोलापूर शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्याऐवजी नागरिकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे..
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलताई दास शहराध्यक्ष वैभव गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे जिल्हा सचिव राजेंद्र माने महिला कार्याध्यक्ष मनीषा कोळी अनिल सुर्वे अनिल कुमार अनिल कमभार प्रकाश व्यवहारे आदी उपस्थित होते.
