Type Here to Get Search Results !

गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ३० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त




सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर पथकाने मिरज-सोलापूर महामार्गावरील इचगाव टोल नाक्याजवळ (ता. मोहोळ) मोठी कारवाई करत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य आणि बिअरची बेकायदेशीर वाहतूक पकडली आहे. या कारवाईत एका चारचाकी वाहनासह सुमारे ३० लाख ९१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


इचगाव टोल नाक्यावर कारवाई


मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार तसेच सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सापळा रचला होता. मिरज-सोलापूर हायवेवरील इचगाव टोल नाक्यावर एका संशयित टाटा इंट्रा चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. 

या तपासणीदरम्यान वाहनातून २३८ बॉक्समध्ये भरलेल्या ७५० मिली आणि १८० मिली विदेशी मद्याच्या ३,८८८ बाटल्या (एकूण २०६८ ब.लि.) तसेच बिअरच्या २६४ बाटल्या (एकूण १३२ ब.लि.) मिळून आल्या. पथकाने वाहनासह सर्व मद्यसाठा जप्त केला असून २ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 


७ महिन्यांत १० कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त


सोलापूर शहर व जिल्ह्यात १ एप्रिल २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत अवैध हातभट्टी, बनावट व परराज्यातील मद्यनिर्मिती आणि विक्रीविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्यात आली आहे. या कालावधीत एकूण १,८२५ गुन्हे नोंदवून १,९२५ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ६,७२,८६६ लिटर रसायन, ४८,६९२.५ लिटर हातभट्टी दारू, परराज्यातील मद्य, देशी-विदेशी मद्य, बिअर, ताडी, लाखो रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, लेबल्स आणि स्पिरिटसह १८२ वाहने जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १० कोटी २२ लाख ९७ हजार ७५५ रुपये इतकी आहे. 


कारवाई पथक


सदर धडक कारवाई निरीक्षक जे. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, समाधान शेळके, तसेच जवान अनिल पांढरे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले, मंगेश मारसिंग आणि स्वप्निल अरमाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.