सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या आठ तासांत तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल २ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याचबरोबर रिक्षामध्ये विसरलेली अर्धा तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स अवघ्या दोन तासांत शोधून महिलेला सुखरूप परत देण्यात आली.
दि. १० नोव्हेंबर रोजी सरस्वती चौक परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली चोरीला गेल्या होत्या. यामध्ये एच.एफ. डिलक्स, सी.डी. डिलक्स आणि बजाज डिस्कव्हर या तीन मोटारसायकलींचा समावेश होता. दि. १२ नोव्हेंबर रोजी या तिन्ही मोटारसायकल चोरीच्या तक्रारी एकाच वेळी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या.
तीनही मोटारसायकली एकाच दिवशी आणि जवळपासच्या परिसरातून चोरीला गेल्याने वरिष्ठ अधिकारी निरीक्षक महादेव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू करण्याचा आदेश देण्यात आला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रोहन सुभाष बालनकर, वय २६ वर्षे, राहणार गणपती मंदिराजवळ, एन.जी. मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर याचा शोध घेण्यात आला.
आरोपी चोरीच्या मोटारसायकलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला कडबा मैदान, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तीनही मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण २ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या. विशेष म्हणजे तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत पोलिसांनी आरोपीला पकडून तिन्ही गुन्ह्यांचा उलगडा केला.
दरम्यान, वरिष्ठ अधिकारीपोलीस निरीक्षक महादेव राऊत यांची महिला विषयी असलेलली संवेदनशीलता देखील पाहायला मिळाली दि. १३ नोव्हेंबर रोजी सरोजा सुनील टिकाबरे या महिला कुंभार वेस येथून रिक्षाने प्रवास करून काळे हॉस्पिटल, नवी पेठ येथे आल्या होत्या. रिक्षातून उतरताना त्यांची अर्धा तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स रिक्षातच विसरली. काही वेळाने ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले.
विशेष म्हणजे संबंधित महिलेला रिक्षाचा नंबर किंवा रिक्षाचे वर्णनही आठवत नव्हते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे रिक्षाचा शोध घेतला. अवघ्या दोन तासांत सोन्याचे दागिने असलेली पर्स शोधून ती महिलेला सुखरूप परत करण्यात आली. यावेळी महिलेच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने केली.
या पथकात पोलीस हवालदार विनायक काळे, महेश शिंदे, बसवराज परीट तसेच पोलीस अंमलदार सुधाकर माने, सुहास गायकवाड, अजय चव्हाण, विनायक जाधव, सूरज सोनवलकर, पंकज घाडगे, कृष्णा बडुरे, विनोद व्हटकर, शशिकांत दराडे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांचा समावेश होता.
एकीकडे मोटारसायकल चोराला बेड्या ठोकत तीन गुन्ह्यांचा उलगडा, तर दुसरीकडे महिलेचे हरवलेले सोन्याचे दागिने परत मिळवून देत फौजदार चावडी पोलीसांनी महिला विषयी असलेली संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

