सोलापूर (प्रतिनिधी)
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगडगाव, शिरवळ (जै.) आणि होटगी येथून मागील चार महिन्यांत चोरीस गेलेल्या चार मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या हस्तगत करण्यात वळसंग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी करमाळा, पुणे जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे तपास करून चार आरोपींना अटक केली आहे. हस्तगत केलेल्या मोटारसायकली संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आल्या आहेत.
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना तपास अधिकारी पोलीस हवालदार श्रीशैल माळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर पोलिसांनी बेंगळुरू येथे जाऊन तपास केला. या तपासादरम्यान चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, तक्रारदारांना त्यांच्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली पुन्हा मिळाल्या आहेत.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात हवालदार श्रीशैल माळी, पोलीस हवालदार विकास क्षिरसागर, पोलीस नाईक संतोष चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल महेश कुंभार आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद मांढरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
