सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सौरऊर्जा प्लांट तसेच नदीकाठच्या विद्युत मोटारी व पानबुडी मोटारींमधील कॉपर वायर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कॉपर वायर चोरीचे तब्बल ६ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, १४५ किलो वजनाची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ८८ हजार ५०० रुपये आहे.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सौरऊर्जा प्लांट, इलेक्ट्रिक पंप तसेच पानबुडी मोटारींमधील कॉपर वायर चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकाने कॉपर वायर चोरीच्या
गुन्ह्यांचा तपास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे संशयित जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रानमसले, ता. उत्तर सोलापूर येथे असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रानमसले येथील समाधान नवनाथ पवार (वय २१) याने साथीदारासह सौरऊर्जा प्लांट तसेच विविध ठिकाणांहून कॉपर वायरची चोरी केली आहे. चोरीचा माल विक्री करण्यासाठी तो घरासमोर थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री करून पोलिसांनी रानमसले येथे जाऊन समाधान पवार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारासह मागील काही महिन्यांपासून कॉपर वायर चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरातून १४५ किलो कॉपर वायर जप्त
पोलिसांनी समाधान पवारच्या घराची झडती घेतली असता, प्लास्टिकच्या वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेली कॉपर वायर आढळून आली. आरोपीने सोलर प्लांट आणि नदीकाठच्या ठिकाणांवरून केबल व कॉपर वायर चोरी करून ती रानामध्ये जाळत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यातून मिळालेला तांब्याचा माल वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून विक्रीसाठी ठेवला जात असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १४५ किलो कॉपर वायर जप्त केली असून, त्याची किंमत १ लाख ८८ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या ६ गुन्ह्यांची उकल
आरोपीने चोरी केलेली ठिकाणे दाखविल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांमधील अभिलेख तपासण्यात आले. त्यामध्ये कॉपर वायर चोरीचे खालील गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
वैराग पोलीस ठाणे – गुन्हा क्र. 248/2026
माढा पोलीस ठाणे – गुन्हा क्र. 125/2026
माढा पोलीस ठाणे – गुन्हा क्र. 211/2026
टेंभुर्णी पोलीस ठाणे – गुन्हा क्र. 118/2026
टेंभुर्णी पोलीस ठाणे – गुन्हा क्र. 139/2026
टेंभुर्णी पोलीस ठाणे – गुन्हा क्र. 207/2026
वरील सर्व गुन्ह्यांमध्ये BNS कलम 303(2) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदर आरोपीला वैराग पोलीस ठाणे गुन्हा क्र. 248/2026 मधील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याच्या अन्य साथीदाराचा सहभाग तसेच आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ नागेश कोणदे, मोहन मनसावाले, तसेच पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडीबा मोरे, अक्षय डोंगरे, सतीश बुरकुल, कपिल काटकर आणि महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांचा समावेश होता.
कॉपर वायर चोरीच्या घटनांनी त्रस्त असलेल्या सोलापूर ग्रामीण भागातील नागरिकांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला असून, चोरीच्या मालामागील संपूर्ण साखळीचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.
