Type Here to Get Search Results !

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीत स्त्रीशक्तीचे योगदान मोठे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील : मोहन डांगरे मित्र परिवारातर्फे तब्बल ८०० अंगणवाडी सेविकांचा साडी देऊन झाला सन्मान

 



सोलापूर  (प्रतिनिधी ) 


अंगणवाडी सेविकांकडून आणि समाजातील प्रत्येक आईकडून पुढची पिढी घडवण्याचे महान कार्य होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या 'विकसित भारत २०४७' च्या स्वप्नपूर्तीत स्त्री शक्तीचे योगदान मोठे राहणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे मित्र परिवारातर्फे आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत सोमवारी ८०० अंगणवाडी सेविकांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते साडी देऊन सन्मानित करण्याचा सोहळा श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झाला.


याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, भाजपा शहर उपाध्यक्ष आणि संयोजक मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय खोमणे, दिपक ढेपे, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर उपस्थित होते.






व्याहूर्ती होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देश जगात ११ व्या क्रमांकावर होता. आता तो चौथा क्रमांकावर आहे. २०४७ साली भारताला देशाला जगात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प म्हणजेच विकसित भारताचा संकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत राहूया. महिलेला समाजात मानाचे स्थान मिळावे या हेतूने अंगणवाडी सेविकांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. देशात १४२ कोटी लोकसंख्येपैकी ७१ कोटी महिलांची लोकसंख्या आहे. त्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात महिलांना संधी दिली आहे. तसेच लखपती दीदी, विद्यार्थिनींसाठीची पोस्टाची योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण अशा अनेक योजना त्यांच्या कार्यकाळात आणल्या आहेत. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होणार आहे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी ८०० अंगणवाडी सेविकांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. 


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश डांगरे, शुभम चिट्याल, अविनाश शंकू, बाबू चिप्पा, विवेक नक्का, व्यंकटेश बंडा, अंबादास पोगुल, उमेश चिट्याल, लक्ष्मीकांत येलदी यांनी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे संयोजक आणि भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रथमेश कासार यांनी सूत्रसंचालन तर योगेश डांगरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.