Type Here to Get Search Results !

दरोड्याच्या तयारीतील ७ सराईत गुन्हेगार जेरबंद; १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त शहर गुन्हे शाखेची सिनेस्टाईल कारवाई




सोलापूर ( प्रतिनिधी) 


सोलापूर शहरात दरोडा टाकून लूट करण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना शहर गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, तलवारी, खंजीर, कटावणी यासह चारचाकी वाहन आणि दुचाकी असा एकूण १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ही कारवाई २० सप्टेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील अमर ज्योती नगर, नरसिंग नगरजवळ, मुळेगाव रोड परिसरात करण्यात आली.


पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी केली असता राजेश कन्नीराम राठोड याने, “आज रात्री ते पहाटे दरम्यान आम्ही सोलापूर शहरामध्ये दरोडा टाकून लूट करणार होतो. त्याकरिता आम्ही आज दिवसभरात पूर्वतयारी करून सदरची हत्यारे व सामान जमा केले आहे,” असे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.


संशयित दरोड्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन तलवारी, तीन खंजीर, दोन कटावणी, एक छन्नी, लांब दोरखंड, तीन जोड हॅन्डग्लोव्हज, दोन नंबर प्लेट, एक कलर स्प्रे बॉटल, सात मोबाईल, महिंद्रा एक्सयूव्ही ५०० आणि यामाहा मोटारसायकल असा एकूण १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


गुन्हा दाखल; सातही आरोपींना अटक


पोलीस शिपाई अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) (२), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे


अटक केलेल्या आरोपींची अधिक चौकशी केली असता, त्यांच्याविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आणि हत्यार कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित गुन्ह्यांची यादी पोलिसांनी सोबत जोडली आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, निलेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे, मनोज मोरे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


कारवाईत पोलीस अंमलदार अंकुश भोसले, नंदराम गायकवाड, जावीद जमादार, विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, वाजीद पटेल, बापू साठे, योगेश बर्डे, आबाजी सावळे, धीरज सातपुते, अमोल यादव, विठ्ठल यलमार, गणेश शिंदे, अभिजीत पवार, शंकर याळगी, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसीम शेख, युवराज गायकवाड, भारत पाटील, विशाल कुलकर्णी, सायबर पोलीस ठाण्याचे मच्छींद्र राठोड, चालक शाम सुरवसे, परबत आणि राजशेखर पाटील यांचा सहभाग होता.


जप्त मुद्देमाल :


* १ देशी बनावटीचे पिस्तूल

* ५ जिवंत काडतुसे

* २ तलवारी

* ३ खंजीर

* २ कटावणी

* १ छन्नी

* १ लांब दोरखंड

* ३ जोड हॅन्डग्लोव्हज

* २ नंबर प्लेट

* १ कलर स्प्रे बॉटल

* ७ मोबाईल

* १ महिंद्रा एक्सयूव्ही ५००

* १ यामाहा मोटारसायकल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.