Type Here to Get Search Results !

सोलापूर एसटी स्टँडवरील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारा आरोपी जेरबंद; ४० हजारांचे सोन्याचे गंठण हस्तगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात दमदार कामगिरी

 



सोलापूर (प्रतिनिधी ) 

सोलापूर शहरातील एस.टी. स्टँड परिसरात बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत दागिने व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीला सोलापूर शहर गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीला गेलेले १३ ग्रॅम वजनाचे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हस्तगत करण्यात आले आहे.

शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस.टी. स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या दागिन्यांची व मोबाईलची चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त एम. राज कुमार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी शहर गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस हवालदार हाजीमलंग शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन नंबर एस.टी. स्टँडसमोरील मोकळ्या मैदानात एक व्यक्ती विनापावती सोन्याचे गंठण विक्री करण्यासाठी थांबला आहे.

माहितीची खातरजमा करून स.पो.नि. दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली.

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव उमेर अफसर शेख (वय २७), व्यवसाय रिक्षाचालक, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने सन **२०२४ मध्ये सोलापूर एस.टी. स्टँड परिसरात एस.टी. बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे मिनी गंठण चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११२/२०२४, भादंवि कलम ३७९ अन्वये दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १३ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे मिनी गंठण हस्तगत केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्यासह पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखाणे आणि शंकर याळगी यांनी विशेष कामगिरी बजावली.

एस.टी. स्टँडसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी आपल्या पर्स, मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंबाबत विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.