सोलापूर (प्रतिनिधी ) उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याचे तसेच ग्राहकांकडून महिलांवर नोटा उधळल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत १५ महिला व ग्राहकांची चौकशी करून २६ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, घटनास्थळावरून तब्बल २८ लाख २५ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंदे, नियमबाह्य डान्सबार आणि सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.१५ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगाव येथे असलेल्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान बारमध्ये काही महिला तोकडे कपडे परिधान करून अश्लील हावभाव करत हिंदी व मराठी गाण्यांवर नृत्य करत असल्याचे आढळले. तसेच ग्राहकांकडून महिलांच्या अंगावर नोटा उधळल्या जात असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकारातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांसह संबंधित कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या १५ महिला व ग्राहकांची चौकशी करून त्यांची नावे-पत्ते निष्पन्न केले. कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि इतर साहित्य असा एकूण २८,२५,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बारचा चालक, मालक, व्यवस्थापक तसेच अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६, २२३, ३(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३/१३१ तसेच महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष, बाररूम यामधील नृत्य व अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्वेता चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक शारदा नवनाथ घोळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जर्दै, पोलीस अंमलदार प्रविण बापू वाळके निलेश भारत जानकर आदित्य चंद्रशेखर कांबळे अनिल भास्कर पवार तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.
अवैध धंदे खपवून घेणार नाही : अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही स्वरूपाचे अवैध धंदे, नियमबाह्य डान्सबार, अश्लील नृत्याचे कार्यक्रम अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारांत सहभागी व्यक्ती तसेच त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिला आहे.
