Type Here to Get Search Results !

कॉलेज विद्यार्थ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी; फौजदार चावडी पोलिसांची दमदार कारवाई

 



सोलापूर (प्रतिनिधी ) कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणात एका १९ वर्षीय आरोपीसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली अॅक्सेस मोटारसायकल असा एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


दि. २० मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४० वाजता सिंहगड कॉलेज ते एमआयटी कॉलेज सर्व्हिस रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ आयान मोहसीन डोनगांवकर आणि त्याचे मित्र जीवनकुमार शिवकुमार तोळनुरे, महंमद अनस अबीद खलीफा, खिजर यासीर बागवान आणि याहीया यासीर बागवान हे बोलत थांबले होते.


यावेळी अॅक्सेस मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी तरुणांनी विद्यार्थ्यांजवळ जाऊन पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महंमद अनस अबीद खलीफा यांच्या पॅन्टच्या खिशातील ३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेत तिघेही मोटारसायकलवरून पसार झाले.


या घटनेनंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५), शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


*सीसीटीव्हीच्या अस्पष्ट फुटेजवरून तपासाला दिशा*


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.


फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी परिसरातील हॉटेल्स आणि लॉजेस तसेच महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.


या तपासात घटनास्थळापासून काही अंतरावर संशयित आरोपी गुन्हा करून मोटारसायकलवरून वेगाने जात असल्याचे अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले.


पुण्यातील धागा पकडत आरोपीपर्यंत पोहोचले

अस्पष्ट फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखवून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. पोलीस अंमलदार अजय चव्हाण आणि सपोनि संजय क्षिरसागर यांना मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींपैकी एक पुण्यातील चाफेकर चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली.


त्यानुसार २२ सप्टेंबर रोजी पोलिसांचे पथक पुणे येथे रवाना झाले. संशयिताकडे चौकशी केली असता तो विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आले. पालकांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची माहिती दिली. त्याचे दोन साथीदार प्रज्वल गवळी आणि आणखी एक विधिसंघर्षग्रस्त बालक सोलापूरमध्ये असल्याचे त्याने सांगितले.


तसेच पिस्तुल आणि रोख रक्कम त्यांच्याकडे असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.


     *बाळे ब्रिजवर दोघांना ताब्यात*


या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. २३ सप्टेंबर रोजी बाळे ब्रिज परिसरातून प्रज्वल वित्तेश गवळी आणि दुसऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली अॅक्सेस मोटारसायकल, एक गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.


     *१९ वर्षीय आरोपी न्यायालयीन कोठडीत*


या प्रकरणातील आरोपी प्रज्वल वित्तेश गवळी (वय १९, रा. न्यू बुधवार पेठ, सारडा हॉस्पिटलसमोर, सम्राट चौक, सोलापूर) हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देशमुख करीत आहेत.


ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त विभाग-१ अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्यासह पोलीस अंमलदार अजय चव्हाण, महेश शिंदे, कृष्णात बडुरे, विनोद पुजारी, दत्तात्रय कोळवले, विनायक जाधव, रवि धेंडे, विनोद व्हटकर, बसवराज परीट, सुरज सोनवलकर, पंकज घाडगे, कुमार शेळके, शशिकांत दराडे, नितीन मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, तौसीफ शेख, अतिश पाटील, सचिन बाबर आणि आयाज बागलकोटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.