Type Here to Get Search Results !

गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक साजरा करा. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांचे आवाहन; बार्शी येथे शांतता समितीची बैठक

 



​सोलापूर (प्रतिनिधी ) आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजन कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी येथे शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, शांतता समितीचे सदस्य आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


​यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी गणेशोत्सव शांततेत, पर्यावरणपूरक आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व ध्वनीमर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश देत त्यांनी ‘No DJ, No Dolby’ या संकल्पनेला प्राधान्य देण्याची सूचना केली. या बैठकीदरम्यान उपस्थित सर्वांनी 'No DJ, No Dolby' ची शपथही घेतली. 


​उत्सवादरम्यान सामाजिक सलोखा व शांतता बाधित होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या कोणत्याही संशयास्पद, आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक संदेशांची खातरजमा न करता त्यावर प्रतिक्रिया देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा त्या पसरवू नयेत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. 





​पोलीस अधिकाऱ्यांची स्वतंत्र आढावा बैठक

बार्शी येथील कार्यक्रमानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, संवेदनशील ठिकाणी विशेष गस्त व लक्ष ठेवणे, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक नजर ठेवणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. 


​गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा सण असल्याने सर्व नागरिक, गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयातून हा उत्सव उत्साहात व नियमांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.