सोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या चार गुन्ह्यांचा शोध लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल असा एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरातून सोन्याचे दागिने आणि गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरीला गेल्याबाबत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५(ए) नुसार चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार आणि व.पो.नि. गुन्हे श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री. अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. तसेच, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गणेश किसन बोधवाले (रा. लोधी गल्ली, आर. के. हॉस्पिटलजवळ, सोलापूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २६,६४८ रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अरूण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार आणि व.पो.नि. गुन्हे श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे संदीप जावळे, सचिन भांगे आमासिध्द निंबाळ सचिनकुमार लवटे सुहास अर्जून अमर शिवशिंगवाले, अजित माने नागेशसिंग चव्हाण कुमार बोल्ली, सकलेन मुकादम अविनाश डिगोळे अमोल खरटमल आणि महिला पोलीस अंमलदार नागमणी म्हेत्रे यांच्या पथकाने केली.
