सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर शहरातील दत्त चौक परिसरात एका वृद्ध व्यक्तीकडील 1 लाख रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा गुन्हा शहर गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उघडकीस आणला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 16 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पथक जबरी चोरी, मोटारसायकल चोरी आणि इतर चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस, मार्केट चौकी ते हरिभाई प्रशाला जाणाऱ्या रस्त्यावर दोन संशयित व्यक्ती मोटारसायकलसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री करून पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे मल्लिनाथ राजशेखर जवळगी (वय 36) आणि नागेश मल्लिनाथ बळते (वय 18 वर्षे ) अशी आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांनी दत्त चौक येथील राजेंद्र ज्वेलर्सच्या दुकानाजवळून पायी जात असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा पाठलाग करून दमदाटी केली आणि त्यांच्याकडील 1 लाख रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून पळून गेल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत आरोपींकडून 1 लाख रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेली 1 लाख रुपये किमतीची युनिकॉर्न मोटारसायकल (MH-13-DF-5334) असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 708/2026, भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा अवघ्या 12 तासांत उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे आणि शंकर याळगी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
