सोलापूर (प्रतिनिधी ) जुन्या वादाच्या रागातून तीन मित्रांनी उमर मौलाली बिराजदार (वय उमर बिराजदार २२, रा. मजरेवाडी, नई जिंदगी) याचा बुधवारी मध्यरात्री कोयत्याने डोक्यावर, हातावर सात वार करून खून केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मन्सूर नदाफ (वय २०), अविनाश चव्हाण (वय २२), आहाद सय्यद (वय २३) अशी संशयितांची नावे आहेत.
मृत उमर हा सोलापुरातून कलबुर्गी (कर्नाटक) येथे चिकन सेंटरवर काम करीत होता. तो १५ दिवसांतून एकदा सोलापुरात घरी येत होता. मंगळवारी (ता. ४) रेल्वेने उमर घरी आला होता. येताना रेल्वेत त्याचा मोबाईल चोरी झाला होता. त्यामुळे बुधवारी तो नवीन मोबाईल आणायला म्हणून घराबाहेर गेला होता. दरम्यान उमरला ड्रींक करण्याच्या निमित्ताने संशयितांनी शांती चौकातील पाण्याच्या टाकीजवळ नेले. मद्यपानावेळी जुन्या वादाचा विषय निघाला आणि भांडण सुरू झाले.
त्यावेळी तिघांनी सोबत आणलेल्या कोयत्याने उमरच्या डोक्यावर तीन-चार, हातावर तीन वार करून खून केला. गुरूवारी (ता. ६) सकाळी सातच्या सुमारास शांती चौकातील पाण्याच्या टाकीजवळ एका तरूणाचा मृतदेह आढळला.
पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर डॉ. अश्विनी पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त अरूण देवकर, दिलीप पवार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी-अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह लादेन यांच्या रूग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज,
खबऱ्यांच्या माध्यमातून संशयितांची माहिती काढली आणि त्या तिघांनाही काही तासांतच पकडले. गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.
