Type Here to Get Search Results !

सदर बझार पोलीस ठाण्याचा पदभार घेताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे ऍक्शन मोडवर धडाकेबाज कारवाई ला केली सुरुवात

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले. या कारवाईदरम्यान जबरी चोरीसह एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपींकडून ₹45,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 30 जून 2026 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील रामवाडी सिमेंट गोडाऊनजवळील तिकीट काऊंटर येथे फिर्यादी स्वप्निल सुभाष उपळकर (वय 35, रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर) यांना तीन अनोळखी इसमांनी अडवून त्यांच्याकडील रिअलमी कंपनीचा सुमारे ₹10,000 किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच फिर्यादीला धमकावत खिशातील ₹6,000 रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. 

 या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 539/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 309(2), 309(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे प्रेम प्रकाश गायकवाड (वय 20, रा. पटवर्धन चाळ, वांगी रोड, सोलापूर) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला. 

तपासादरम्यान समीर अकबर पटेल (वय 21, रा. थोरली इराण्णा वस्ती, सोलापूर) व नैतिक वसंत जाधव (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) यांची नावे निष्पन्न झाली. समीर पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून नैतिक जाधव हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या कारवाईत आरोपींकडून ₹5,500 रोख रक्कम व सुमारे ₹40,000 किमतीचा मोबाईल असा एकूण ₹45,500 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींकडून जबरी चोरीसह एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2 विजयालक्ष्मी कुरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि राहुल सावंत तसेच त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.