सोलापूर (प्रतिनिधी ) मित्रांसोबत जेवण करून घराकडे निघालेले चौघेजण - वाटेत लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या १० जणांनी त्यांना लुटले आणि दोन लाख ३५ हजारांचा ऐवज हिसकावून नेला होता. या गुन्ह्यातील चार संशयितांना विजापूर नाका पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
विजापूर रोडवरील निशा हॉटेलजवळील मोकळ्या मैदानावर चौघांना दुचाकीवरून आलेल्या १० जणांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. १९ जुलै रोजी पहाटे दोन-सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी संजय केरबा भडंगे(रा आंबेडकर नगर )यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादी संजय भडंगे आणि त्यांचे मित्र विपुल थोरे, मस्के व कोळी यांनाही चोरट्यांनी लुटले होते. भडंगे यांनी २२ जुलै रोजी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादी व त्यांचे मित्र सिमेंट, वाळू व खडी विक्री करतात. त्यामुळे त्यांच्याकडे ८० हजार रुपयांची रोकड होती. गळ्यात सोन्याची चेन, हातात अंगठ्या होत्या. तो सर्व ऐवज त्या १० जणांनी लुटून नेला होता. संशयित आरोपींमध्ये सोलापुरातील शास्त्री नगरात राहणाऱ्या सादिक झाकीर शेखचा सहभाग समोर आला आहे. तो सध्या कोंडवा भागात राहतो वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड यांच्या पथकाने "सीसीटीव्ही "च्या आधारे संशयितांचा शोध घेऊन चौघांना जेरबंद केले.
