Type Here to Get Search Results !

जोडभावी पेठ गुन्हे शाखेच्या 'कॉम्बिंग ऑपरेशन'ला यश; शेळगी येथील दुचाकी चोरट्याकडून 4 गुन्हे उघडकीस




सोलापूर(प्रतिनिधी )शहरात गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष 'कॉम्बिंग ऑपरेशन' दरम्यान जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला (गुन्हे शाखा) मोठे यश आले आहे. दयानंद कॉलेज परिसरामध्ये अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत १ लाख १० हजार रुपये आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक पेट्रोलींग करत होते. दरम्यान, दयानंद कॉलेजजवळील लेडीज हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या कॉलेज मैदानाकडे जाणाऱ्या बोळात एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी थांबला असल्याची खात्रीशीर माहिती कॉम्बिंग अधिकारी व अंमलदारांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि संशयित आरोपी अशोक अर्जुन कोळी (वय ३८ वर्षे, रा. शेळगी गावठाण, सोलापूर; व्यवसाय: मजुरी) याला ताब्यात घेतले.


*4 गुन्हे उघडकीस, वाहने जप्त*

आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याच्या ताब्यातील व त्याने चोरलेल्या इतर मोटारसायकलींची माहिती समोर आली. त्याच्याकडून जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील २ आणि जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील २ अशा एकूण ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चार गुन्हे उघडकीस आले असून, या सर्व प्रकरणांमध्ये 'बी.एन.एस.' (भारतीय न्याय संहिता) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल आहेत.

*जप्त केलेल्या मोटारसायकलींचा तपशील*

१. जोडभावी पेठ पोलीस ठाणे (गुन्हा रजि.नं. ५३७/२०२६): हिरो कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. MH-13-EA-3246) – किंमत ३०,०००/-

२. जोडभावी पेठ पोलीस ठाणे (गुन्हा रजि.नं. ५३६/२०२६): हिरो कंपनीची काळ्या रंगाची फॅशन प्रो मोटारसायकल (क्र. MH-13-BG-0836) – किंमत ३०,०००/-

३. जेल रोड पोलीस ठाणे (गुन्हा रजि.नं. ३५५/२०२६): हिरो कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. MH-13-BZ-3558) – किंमत ३०,०००/-

४. जेल रोड पोलीस ठाणे (गुन्हा रजि.नं. ३५६/२०२६): काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. MH-13-DF-4765) – किंमत २०,०००/-

एकूण किंमत: १,१०,०००/- (एक लाख दहा हजार रुपये)

या उल्लेखनीय कामगिरी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी, पोलीस निरीक्षक अमोल मिसाळ (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोहेकॉ खाजप्पा आरेनवरु, पोहेकॉ शिवानंद लोहार, पोहेकॉ शितल शिवशरण, पोकॉ निलेश घोगरे आणि पोकॉ दत्ता मोरे यांनी ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.