सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या निर्देशानुसार ‘ऑपरेशन समन्वय’ अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महावितरण, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी निर्मिती व मद्यविक्रीविरोधात मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ लाख २५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सागर धोमकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव आणि उपअधीक्षक श्री. सौरभ बा. अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जून रोजी ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महावितरण, ग्रामीण पोलीस, महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे टाकून ४,२५० लिटर रसायन जप्त करण्यात आले. याप्रकरणी ३ गुन्हे नोंदवून ३ जणांवर कारवाई करण्यात आली असून १ लाख ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हातभट्टी निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर साठविण्यात आलेल्या लाकूडसाठ्यावर तसेच अनधिकृत सॉ-मिलवर वन विभागाने स्वतंत्र कारवाई केली. यामध्ये दोन आरा यंत्रे, तीन ग्यांडर यंत्रे, एक विद्युत मोटार, सहा चेन-सॉ, दोन वजन काटे तसेच १६० घनमीटर लाकूडसाठा असा सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच हातभट्ट्या व अनधिकृत सॉ-मिलसाठी वीजचोरीद्वारे वापरण्यात येणारे वीजजोडणीचे साहित्य महावितरण विभागाने जप्त केले. यामध्ये वीजजोडण्या तोडून ४०० मीटर वायर जप्त करण्यात आली असून सुमारे ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यापूर्वी ४ जून २०२६ रोजी महानगरपालिका अतिक्रमण विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने रामलाल चौक व स्टेशन रोड परिसरात विना परवाना मद्यपान करणाऱ्यांवर तसेच अवैध टपऱ्या, सोडा-वॉटर गाड्या आणि टेबल-खुर्च्यांवर कारवाई करण्यात आली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिल २०२६ ते १९ जून २०२६ या कालावधीत ७०८ गुन्हे नोंदवून ५६ वाहनांसह सुमारे २ कोटी ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध हातभट्ट्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलीस व अन्य यंत्रणांच्या सहकार्याने संयुक्त मोहिमा राबविण्यात येत आहेत. अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक किंवा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांनाही अशा कारवाईत आरोपी करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यांसारख्या पदार्थांच्या भेसळीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांनी केले आहे.
