Type Here to Get Search Results !

दक्षिण आफ्रिकेच्या खडतर अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांची दमदार कामगिरी कॉमरेड्स स्पर्धेत दत्तात्रेय काळे व हेमंत वाघमारे यांनी फडकावला तिरंगा; महाराष्ट्र पोलिसांत प्रथम येण्याचा मान




सोलापूर (प्रतिनिधी ) जगातील सर्वाधिक खडतर आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कॉमरेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत सोलापूर शहर पोलीस दलातील दोन धावपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय काळे आणि पोलीस शिपाई हेमंत वाघमारे यांनी उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.


सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय काळे तसेच पोलीस आयुक्तांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलीस शिपाई हेमंत वाघमारे यांनी ८५.७७७ किलोमीटर अंतराची ही अत्यंत कठीण चढाईची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत जगभरातील तब्बल २१ हजार ६७८ धावपटूंनी सहभाग घेतला होता.


राष्ट्रगीतानंतर पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या स्पर्धेत दत्तात्रेय काळे यांनी १० तास २३ मिनिटांत तर हेमंत वाघमारे यांनी अवघ्या ९ तास २९ मिनिटांत अंतर पूर्ण केले. या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलातून प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला.


‘द अल्टिमेट ह्युमन रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉमरेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये अनेक कट-ऑफ पॉइंट्स असतात. निर्धारित वेळेत ते गाठण्यात अपयशी ठरल्यास स्पर्धक बाद होतो. त्यामुळे ही स्पर्धा मानवी सहनशक्ती, मानसिक ताकद आणि जिद्दीची खरी कसोटी मानली जाते.


प्रखर थंडी, उष्णता, जीवघेणे चढ-उतार आणि विविध शारीरिक-मानसिक आव्हानांवर मात करत दोन्ही धावपटूंनी स्पर्धा पूर्ण केली. अंतिम ४०० मीटरमध्ये हजारो प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अविस्मरणीय अनुभव मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अंतिम रेषा पार करत तिरंगा फडकावत भारताचा गौरव जगासमोर मांडण्याचा अभिमानास्पद क्षण त्यांनी अनुभवला.


या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दत्तात्रेय काळे आणि हेमंत वाघमारे यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.