सोलापूर (प्रतिनिधी) येथील अवंती नगरातून
चोरट्याने सूर्यभान पाटील यांची कार (एमएच १३, डीई ३०८४) चोरली होती. कारमधून आलेले चोरटे उमरग्याच्या दिशेने पसार झाले, पण त्यांनी सर्व टोल नाके चुकवले होते. तरीपण, फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरट्याला तेलंगणातून शोधले. त्याने चोरलेली सोलापुरातील एक, तुळजापूर (जि. धाराशिव), खदान (जि. अकोला), शिरपूर (जि. यवतमाळ) या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या चार दुचाकीही जप्त केल्या आहेत.
चोरटे सोलापुरातील कार चोरून उमरगा, औसा, लातूर, उदगीर, मुखेडमार्गे पसार झाले होते. पोलिसांना या मार्गावर चोरट्यांच्या कारचा क्रमांक (एमएच २२, एम १०३५) सीसीटीव्हीतून मिळाला. मात्र चोरटे सापडणार म्हणून पोलिसांचे एक कार क्रमांकावरून परभणीला गेले. ती कार दोन वर्षांपासून संभाजीनगर मधील शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवल्याचे समजले चोरट्यांनी बनावट नंबरप्लेट लावून पोलिसांची दिशाभूल केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने चोरट्यांचा नव्याने तपास सुरू केला. मुखेडपासून पुढे सीसीटीव्ही तपासायला सुरवात केली. तेथून पोलिस तेलंगणातील बोधन गावात पोचले. तेलंगणात प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या गाडीची मूळ नंबरप्लेट बसविली होती. सलग १५ दिवस गुन्हे प्रकटीकरण पथक जिल्ह्याबाहेर होते. त्या क्रमांकाचा शोध घेत पोलिस निझामाबादपर्यंत गेले. ६ जूनला तेथील पोलिसांची मदत घेऊन मेहमूद शेख खान यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने साथीदार हजरत खान (रा. कुर्ला) याच्यासोबत विविध जिल्ह्यांतून कार चोरल्याची कबुली दिली. आता पोलिसांचे पथक अटकेतील चोरट्याचा साथीदार हजरत खान याच्या शोधासाठी मुंबईला रवाना झाले आहे.
*तब्बल 500 किलोमीटर पर्यंत सिसिटीव्ही ची तपासणी*
कार चोराच्या शोधासाठी फौजदार चावडी पोलिसांनी 500 किलोमीटर पर्यंतचे सिसिटीव्ही फुटेज पाहिले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त प्रितम यावलकर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हवालदार भाऊ कसबे अमोल खरटमल रवी धेंडे कृष्णात बडूरे विनोद पुजारी विनोद व्हटकर कुमार शेळके शशिकांत दराडे शिवानंद भीमदे सूर्यकांत दराडे अतिश पाटील विनायक जाधव अजय चव्हाण ज्ञानेश्वर गायकवाड पंकज घाडगे आयाज बागलकोटे सौरभ पाटील यांनी पार पाडली.
