सोलापूर (प्रतिनिधी ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर या कुशल प्रशासक तर होत्याच, पण त्या प्रजाहितासाठी सदैव तत्पर रणरागिणीही होत्या. ३०० वर्षांपूर्वीच त्यांनी महिलांचे सैन्यदल स्थापन केले, महिला सक्षमीकरण व स्वरंक्षणाचे धडे दिले, असे प्रतिपादन डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती सप्ताहानिमित्त विद्यापीठात वृक्षारोपण व आरोग्य शिबिर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पिंक रिव्हलेशनचे डॉ. श्रद्धा जवंजाळ व डॉ. राहुल जवंजाळ, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर,विध्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. मुकुंद माळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी केले.
डॉ. जयकर म्हणाले, 'अहिल्यादेवींना त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचे मोठे मार्गदर्शन लाभले. त्यांनी भगवान शिवाचे स्मरण ठेवून न्यायप्रिय आणि लोकाभिमुख राज्यकारभार केला. आजही त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळते'. डॉ. जयकर यांनी यावेळी वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटल मधील सुविधांची माहिती दिली. तसेच, रक्तदानास शासकीय व निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू महानवर यांनीही मार्गदर्शन केले व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा देवानंद चिलवंत, वित्त व लेखा अधिकारी महादेव खराडे, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा श्रुती देवळे यांनी केले. आभार डॉ मुकुंद माळी यांनी मानले.

