सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक मोठी कारवाई केली आहे. जुना देगाव नाका परिसरातील साठे पाटील वस्ती येथील एका सक्रिय गुन्हेगारी टोळीला सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे.
तडीपार केलेल्या आरोपींची नावे
१) तेजस सुधाकर बैरुनगी (वय २४ वर्षे, रा. साठे पाटील वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर) – (टोळी प्रमुख)
२) रोहीत यल्लप्पा लोणी (वय २४ वर्षे, रा. साठे पाटील वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर)
३) संदेश नागेश रामगुडे (वय २३ वर्षे, रा. साठे पाटील वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर)
अनेक गंभीर गुन्हे दाखल
या टोळीविरुद्ध सन २०२१, २०२२, २०२३ आणि २०२५ या कालावधीत टोळीच्या माध्यमातून बेकायदेशीर कृत्य केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जाणीवपूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर मंडळी जमवून दंगा करणे, चोरी आणि घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
*पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर यांचा आदेश*
या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडून 'महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१' मधील कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी धडाकेबाज कारवाई करत २५ मे २०२६ रोजी या तिघांना दोन वर्षांसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.पोलीस उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारताच प्रितम यावलकर यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचा विढा उचलला असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तडीपारी सारख्या धडाकेबाज कारवाई ला सुरुवात केली आहे.
