सोलापूर (प्रतिनिधी) : बार्शी शहरातील बालाजी कॉलनी परिसरात पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २७ लाख ८७ हजार ९०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित गोदाम सील करण्यात आले आहे.
माहितीनुसार, बार्शी उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे आणि सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता संबंधित गोदाम कुलूपबंद अवस्थेत आढळून आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष गोदाम उघडण्यात आले. आत तपासणी केली असता विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
पोलिसांनी सुमारे ९७ गोण्यांमधील प्रतिबंधित माल जप्त केला. मुद्देमालाचे प्रमाण मोठे असल्याने तो वाहून नेण्यासाठी तीन मालवाहू टेम्पोंची मदत घेण्यात आली. जप्त केलेला सर्व माल बार्शी शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
या प्रकरणी बिलाल शब्बीर तांबोळी आणि सरफराज शरीफ तांबोळी (रा. बार्शी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयित सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोलापूर येथील अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी रामानंद स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुढील कारवाई सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा व्यवसायात खळबळ उडाली असून आयपी एस लेडी सिंघम अंजना कृष्णा यांच्या धडक कारवाई ने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
