Type Here to Get Search Results !

संपर्कप्रमुख प्रा.सुषमाताई अंधारे यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीला स्थगिती द्या प्रा अजय दासरी यांची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी




सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शिवसेना संघटनात्मक घडामोडींमुळे तळागाळातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये संभ्रम, नाराजी आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील घडामोडींची वस्तुस्थिती मांडण्यात आली.


दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सुषमाताई अंधारे यांच्या नियुक्तीबाबत सुरुवातीपासूनच विरोधाभासी माहिती समोर आली. महिला आघाडी संपर्क संघटिका म्हणून झालेल्या निवडीची बातमी प्रसिद्ध होत असताना, त्यांनी स्वतः शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. या दोन वेगवेगळ्या माहितीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.


यानंतर २५ जानेवारी २०२६ रोजी सोलापूर येथे त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद, महाविकास आघाडीची बैठक आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाची कारणे मांडण्यात आली. तसेच पक्षविरोधी काम करणाऱ्या काही व्यक्तींवर कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत त्या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे.


पुढील काळात झालेल्या घटनांमध्ये अनेक विसंगती दिसून आल्या. २७ जानेवारी रोजी एका तालुका पदाधिकाऱ्याच्या राजीनाम्याबाबत विरोधाभासी माहिती समोर आली. तसेच त्यानंतरच्या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला.


२४ फेब्रुवारी रोजी पुन्हा सोलापूर जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आला. मात्र, ११ विधानसभा आणि ११ तालुक्यांचा आढावा केवळ एका दिवसात घेण्यात आल्याने हा दौरा केवळ औपचारिक ठरल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या कालावधीत ग्रामीण भागात एकही सखोल बैठक न घेता बैठका मुख्यतः शहरापुरत्याच मर्यादित राहिल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली.


या बैठकीदरम्यान काही प्रश्न विचारण्याची पद्धतही वादग्रस्त ठरली. शिवसैनिकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेबाबत प्रश्न विचारण्यात आले. शिवसेना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर उभी राहिलेली संघटना असून, कार्यकर्त्यांची निष्ठा हीच त्यांची खरी ओळख आहे. अशा परिस्थितीत आर्थिक निकषांवर प्रश्न विचारणे ही पक्षाच्या परंपरेपासून दूर जाणारी बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


यानंतर जिल्हाप्रमुख व इतर पदांसाठी मुलाखत पद्धतीचा अवलंब करण्यात आला. ही प्रक्रिया पुणे येथे पार पडली. मात्र, या प्रक्रियेबाबत अनेक कार्यकर्त्यांना माहितीच देण्यात आली नव्हती. अनेक पात्र व निष्ठावंत कार्यकर्त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याची भावना व्यक्त झाली. शिवसेनेच्या पारंपरिक कार्यपद्धतीत कधीही अशा प्रकारे मुलाखती घेऊन नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


१३ मार्च रोजी सर्व पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर १७ मार्च आणि ७ एप्रिल रोजी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या नियुक्त्यांमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असून, काही वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना महत्त्वाची पदे देण्यात आल्याचे आरोप करण्यात आले.


या सर्व घटनांमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यपद्धतीबाबत तळागाळात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पक्षाची पारंपरिक रचना, निर्णयप्रक्रिया आणि कार्यकर्त्यांशी संवाद या सर्व बाबींमध्ये बदल होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.


या पार्श्वभूमीवर निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले:

बैठका प्रामुख्याने शहरापुरत्याच का मर्यादित राहिल्या? ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद का साधला गेला नाही?अत्यल्प उपस्थितीत घेतलेल्या बैठकींवर आधारित निर्णय कितपत योग्य आहे? पदनियुक्ती प्रक्रिया पारदर्शक का ठेवण्यात आली नाही? पक्षाच्या परंपरेपासून दूर जाणारे निकष का लावले गेले?


निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत अलीकडील सर्व नियुक्त्यांचा तात्काळ पुनर्विचार करण्यात यावा प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधावा पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने नव्याने निर्णय घ्यावेत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी संपूर्ण वस्तुस्थिती वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय घेण्यात यावा


शिवसेना ही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्याग आणि परिश्रमावर उभी राहिलेली संघटना आहे. त्यामुळे संघटनेच्या बळकटीसाठी निर्णय घेताना तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेला संभ्रम दूर करून संघटनेत पुन्हा एकजूट निर्माण करण्याची गरज आहे.


शेवटी, निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, पक्षातील घडामोडींविषयीची वस्तुस्थिती वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात येणार असून, योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल.असा इशारा प्रा अजय दासरी यांनी या बैठकीत दिला आहे 

यावेळी नवीन निवडी व आक्षेपाबाबत पीपीटी द्वारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करण्यात आले. प्रा.अजय दासरी यांनी घेतलेल्या पत्र परिषदेत दादासाहेब 

 पवार मोहोळ, देवा दिंडोरे बार्शी,शिवाजी नीळ कोंडी उत्तरसोलापूर, रवी घंटे दक्षिण सोलापूर, शशिकांत बिराजदार शहर उत्तर,आनंदकुमार थोरात दक्षिण सोलापूर युवासेना तालुका अधिकारी, नाना मोरे शहर मध्य, पद्माताई म्हंता, रवी म्हेत्रे कामगार सेना, सुमित भांडेकर आरोग्य सेना,अजय विजय बादगुडे युवा सेना बार्शी तालुका अधिकारी शेळगाव ( आर), सोमनाथ तोडकरी, अथर्व सुपाते, दत्ता रुचनभैरे वाहतूक सेना, जगदीश कलकरी जिल्हा संघटक, अमित भांडेकर , सुरेश शिंदे शहर समन्वयक, इब्राहिम पिरजादे, युवराज बादगुडे पाटील, राजू क्षीरसागरर , रमेश शिखरे, अशोक बोकेवाले, महानंदा बनसोडे व जिल्ह्यातील प्रमुख निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.