सोलापूर (प्रतिनिधी ) कौटुंबिक वादातून नैराश्यात आलेल्या एका महिलेने कंबर तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि. १४ एप्रिल) रोजी सकाळी घडली. मात्र, सोलापूर पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाने वेळेवर धाव घेत धाडसी कारवाई करत त्या महिलेला मृत्यूच्या दारातून सुरक्षित बाहेर काढले.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, विभाग २ चे दामिनी पथक सकाळी सुमारे १०:५५ वाजण्याच्या सुमारास हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एका जागरूक नागरिकाने पथकाला माहिती दिली की, एक महिला वन विभागासमोरील कंबर तलाव परिसरात आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आली आहे. माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली.पथक तेथे पोहोचले असता संबंधित महिलेने तलावात उडी मारलेली होती. प्रसंगावधान राखत पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाण्यात उतरून तिला बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचवले. प्राथमिक चौकशीत पती-पत्नीतील कौटुंबिक वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले.
सदर ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि पोलीस निरीक्षक स्नेहा मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक जयश्री कोळी, पोलीस शिपाई सुनीता जाधव आणि पोलीस चालक प्रतीक्षा शिंदे यांनी बजावली.घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेचे समुपदेशन केले. तसेच तिच्या पती व आईला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांनाही समज देण्यात आली. त्यानंतर महिलेला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. ‘दामिनी’ पथकाच्या या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे.
