सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहर गुन्हे शाखेने राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून आंतरजिल्हा पातळीवर सक्रिय असलेला सराईत चोर जेरबंद करण्यात आला आहे. आरोपीकडून तब्बल १५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ४५ हजार रुपये आहे.
शहरात वारंवार मोटारसायकल चोरीचे प्रकार घडत असल्याने पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने यांनी गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांनी विशेष पथक गठीत करून तांत्रिक तपासावर भर देण्याच्या सूचना केल्या.
सीसीटीव्ही विश्लेषणातून आरोपीपर्यंत पोहोच
सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६४/२०२६, भा.न्या.सं. २०२३ कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी तांत्रिक विश्लेषण केले, तर संदीप जावळे यांनी संशयिताची ओळख पटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने विष्णू घाट परिसरात सापळा रचून नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या इसमाला ताब्यात घेतले.
आरोपीची कबुली; सहा जिल्ह्यांत गुन्हे
ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव सचिन अंकुश कात्रे (वय ४०), मूळ रा. मसोबाची वाडी, ता. वाशी, जि. धाराशिव, सध्या रा. अंबिका चौक, बीड असे सांगितले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने सखोल चौकशीत हुतात्मा स्मृती मंदिर परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
यापुढील तपासात त्याने मागील सहा महिन्यांत अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातून एकूण १४ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्या सर्व गाड्या पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आल्या आहेत.
विविध पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड
सदर बझार, विजापूर नाका (सोलापूर शहर), कोतवाली व शेवगाव (अहिल्यानगर), बीड ग्रामीण, गेवराई, कळंब (धाराशिव), औसा (लातूर), कदीम (जालना) आदी पोलीस ठाण्यांतील गुन्हे या कारवाईत उघडकीस आले आहेत. बी.एन.एस. कलम ३०३(२) व ३०५(बी) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे.
गुन्हे शाखेची संघटित कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजन माने व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्यासह संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, मंजुनाथ मुत्तनवार, दत्तात्रय सूळ, सागर मुटकुळे, चालक बाळासाहेब काळे, सतिश काटे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी बजावली.
गुन्हेगारीला आळा बसणार.
आंतरजिल्हा पातळीवर सक्रिय असलेल्या या आरोपीला अटक झाल्याने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. जप्त केलेल्या १५ मोटारसायकलींची एकूण किंमत ४,४५,००० रुपये इतकी आहे.
सध्या आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू असून काही मोटारसायकलींची अभिलेख पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. शहरातील वाहनधारकांनी वाहन सुरक्षिततेसाठी दक्षता बाळगावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांनी केलं आहे.
