सोलापूर (प्रतिनिधी ) लग्नाच्या वरातीत झालेल्या भांडणाच्या रागातून १० जणांनी मिळून शिवीगाळ केली, घरात घुसून साहित्याची नासधूस केली. घरासमोरील दुचाकीची हेडलाईट फोडून नुकसान केले, अशी फिर्याद दीपक राम जमादार (रा. शिवगंगा नगर भाग-३, पारशी विहिरीमागे, नई जिंदगी रोड) या तरुणाने एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यावरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी (ता. २२) रात्री दहाच्या सुमारास
पारशी विहिरीजवळ हे भांडण झाले. निखिल कजागवाले, अक्षय दिल्लीवाले, सुमित मन्सावाले, विजय लंबूवाले, आनंद मन्सावाले, रवी आंबेवाले, राजू आंबेवाले, रोहित मन्सावाले, शुभम लंबूवाले व नितीन मन्सावाले हे रात्री दहाच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आले. निखीलने फिर्यादी दीपकला हाक मारून घराबाहेर बोलावून घेतले. त्यावेळी दीपक व त्याचे आई-वडील आणि भाऊ घराबाहेर आले. निखीलने विवाहाच्या वरातीत झालेल्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ सुरू केली. त्याने दीपकच्या गालावर चापट मारली.
त्यावेळी दीपकची आई भांडण सोडवायला आली. त्यावेळी अक्षयने तिला शिवीगाळ व दमदाटी करून फायबर पाईपने उजव्या हाताला, डोक्यात आणि हनुवटीवर मारहाण करून जखमी केले. सगळेजण घरात शिरले आणि त्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली. अक्षय दिल्लीवाले याने घरासमोरील दुचाकीचे नुकसान केले, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी फिर्यादीच्या घरी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव तपास करीत आहेत.एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत लग्नाच्या अनेक वराती परवानगी विनाचा काढल्या जात असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने वेळीच लक्ष घातले असते तर अश्या घटना टळल्या असत्या असा सूर नागरिकांमधून आवळला जात आहे.
