सोलापूर (प्रतिनिधी ) महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने सोलापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने शहर पोलिसांसह एकूण चार हजार ६०० पोलिसांचा बंदोबस्त नेमला जाणार आहे. त्यात राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्या, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल देखील आहे. निवडणुकीमुळे १२ ते १७ जानेवारीपर्यंत सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या जाणार आहेत.
सोलापूर शहरातील सण-उत्सवात वर्षातील सुमारे १५० दिवस बंदोबस्ताची ड्यूटी करणाऱ्या पोलिसांना आता निवडणुकीच्याही बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या कारणातून शहरात बाळासाहेब
सरवदे या तरुणाचा खून झाला. महापालिकेतील १०२ जागांसाठी साडेपाचशे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी १० जानेवारीपासून शहरातील काही ठिकाणी पोलिस ठाण मांडून असणार आहेत. सध्या शहरातील गस्त वाढविण्यात आली असून रात्री दहानंतर विनाकारण रस्त्यांवर थांबणाऱ्या किंवा फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दररोज पोलिस उपायुक्तांकडून गस्तीची देखरेख केली जात आहे. १२ ते १४ जानेवारीपर्यंत प्रचार रंगात येणार असून १५ तारखेला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे सहा दिवस पोलिसांना सुट्ट्या घेता येणार नाहीत. त्यासंबंधीचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयास पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रानी दिली आहे.
